Type Here to Get Search Results !

इचलकरंजी ‘राधाकृष्ण पाणी योजना’ रद्द करण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण*


 *इचलकरंजी ‘राधाकृष्ण पाणी योजना’ रद्द करण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण*

इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रस्तावित ‘राधाकृष्ण पाणी योजने’ला विरोध करण्यासाठी राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समिती आणि पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने आज, २८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यात आले.

जुने दानवाड (ता. शिरोळ) येथील उद्भवाचा वापर करून ही योजना राबविल्यास स्थानिक शेती व पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलकांनी केला. त्यामुळे योजना कायमस्वरूपी रद्द करावी किंवा दानवाडऐवजी अन्य पर्यायी उद्भवस्थळाचा विचार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

प्रशासकीय प्रक्रियेवर प्रश्न

जलआक्रोश समितीचे अध्यक्ष संतोष सातु आठवले व सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांना निवेदन दिले. योजनेसाठी आवश्यक परवानग्या, पाणीवाटप आणि स्थानिक पातळीवरील प्रक्रिया याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

दानवाड परिसरात पावसाळ्यात बॅकवॉटरमुळे पूरस्थिती, तर उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी कमी होऊन टंचाई निर्माण होते. अशा परिस्थितीत अतिरिक्त पाणी उपसा केल्यास स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली.

उच्चस्तरीय बैठकीची मागणी

योजना रद्द करण्यासोबतच बाधित ग्रामस्थ, शेतकरी आणि जलआक्रोश समितीच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

या उपोषणात पँथर आर्मीचे प्रमुख संतोषदादा आठवले, राष्ट्रीय महासचिव अमोल कुरणे, ॲड. किरणराव मोरे, महेंद्र वाघमारे, ज्योतीताई झरेकर, आशा मोरे, लक्ष्मीकांत कुंबळे, जावेदभाई शेख, हरिचंद्र जाधव, मच्छिंद्र रुईकर, संजय कांबळे, नितेश कुमार दीक्षित, दिनेश कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते

Post a Comment

0 Comments